आंतरराष्ट्रीय सफारी पार्क

आंतरराष्ट्रीय सफारी पार्क

मोशी येथे साकारतेय भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय सफारी पार्क

मोशी येथील आरक्षित जागेवर सेन्टॉसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा “सफारी पार्क” साकारण्यात येणार आहे. या पार्कसाठी सुमारे १५०० ते १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पर्यटन विभाग (MTDC) महाराष्ट्र शासनच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरित निधी पिं. चिं. महानगरपालिका उभारणार आहे. तीन वर्षांत सफारी पार्क साकारण्यात येईल. महापालिका आणि पर्यटन विभाग (MTDC) महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येईल. शहरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे, देशात प्रथमच हा प्रकल्प राबविणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख जगाच्या नकाशावर होणार आहे.

मोशी येथील शासकीय गायरान जागेवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामधील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सेन्टॉसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क साकारण्यात यावा. त्यासाठी तातडीने एमटीडीसीच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. सफारी पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करावा. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सफारी पार्क साकारण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

समाविष्ट गावांना पर्यटन संजीवनी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, चऱ्होलीचा भाग वेगाने विकसित होत आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प याठिकाणी हाती घेतले आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांच्या पायाभूत सोयी- सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. चिखली, मोशी, च-होली आदी भागांतील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग- व्यवसायाची वृद्धी होणार आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. यासह बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ठ गावांना संजीवनी देण्याचे “व्हीजन” आम्ही ठेवले आहे.