भोसरीची ओळख… शिक्षणाची पंढरी !

सर्व्हे न. ५३९ चिखली येथे १३ एकरामध्ये साकारत आहे

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

पुणे हे ‘शिक्षणाचे माहेर घर’ म्हणून ओळखले जाते. राज्यासह देश-विदेशातून याठिकाणी मुले शिक्षणासाठी येत आहेत. मात्र, याच पुण्याचा भाग असलेला आणि आता वेगाने विकसित होणारे पिंपरी-चिंचवडसुद्धा “एज्युकेशनल हब” म्हणून ओळखले जावे, असा आमचा संकल्प आहे. त्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC), सर परशुराम महाविद्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे (SNDT) महाविद्यालय अशा नामांकीत संस्थांच्या शाखा लवकरच पिंपरी-चिंचवडमध्ये उभारल्या जाव्यात, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. राज्य सरकारच्या नगर रचना विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पाच एकर क्षेत्रफळाचे पाच भूखंड राखीव करण्यात आले आहेत.

“भोसरी व्हिजन – २०२० या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण सुविधा भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये उपलब्ध करण्याबाबत पुढाकार घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील नामांकित शासकीय शिक्षण संस्था असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेच्या शाखेचा विस्तार भोसरीत व्हावा. यासाठी जिल्हा प्रशासन तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून चिखली येथील शासकीय गायरान जागेवर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील १३ एकर जागा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आली.

आगामी काळात आम्ही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणची जागा, राज्य सरकारची परवानगी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून पायाभूत सोयी-सुविधा उपल्ध करुन पुण्यातीलच नव्हे तर, राज्यातील नामांकीत शासकीय शैक्षणिक संस्थांच्या शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.